अमरसिंहचे गोदडनाथ कसे झाले

 

 

अमरसिंह चे गोदड नाथ कसे झाले ..?

 


 

गुरुविण कोण दाखवील वाट.....

चांगला गुरू यशाचे दरवाजे उघडून देऊ शकतो पण त्यातून यशाच्या दिशेने स्वतःलाच चालावे लागते. नारळाचे मजबूत कवच फोडल्या शिवाय आतमधील अमृताचा आस्वाद घेऊ शकत नाही, त्याचप्रमाणे प्रगतीच्या मार्गावर येणाऱ्या संकटावर मात केल्याशिवाय यशस्वीतेचा आस्वाद घेणे शक्य नाही. संघर्ष हा यशाचा एकमेव मार्ग आहे. जर तुम्हाला आयुष्यात खूप संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला खूप नशिबवान समजा कारण नियती संघर्ष करण्याची संधी त्यांनाच देत असते ज्यांच्या मध्ये क्षमता असते. परिवर्तन हा संसाराचा नियम आहे, तो न घाबरता मान्य करावा . जीवनात सर्वात मोठा गुरू हा येणारा काळ असतो. कारण काळ जे शिकवतो ते कुणीही शिकवू शकत नाही.

सद्गुरूंची भेट होईपर्यंत मात्र आपण आपल्याकडून नामस्मरण करीत राहणे आवश्यक आहे कारण ते नामस्मरणच आपल्याला सदगुरूची भेट करवून देईल. तसे पाहता आधी संताची भेट होणे कठीण; समजा भेट झाली तरी त्याच्यावर विश्वास बसणे त्याहून कठीण असते. म्हणून नामाचे साधन चालू ठेवावे. खडीसाखर ठेवली म्हणजे मुंगळयांना आमंत्रण करावे लागत नाही ते आपोआप तिचा शोध काढीत येतात. तसे तुम्ही खडीसाखर बना म्हणजे संत तुमच्याकडे धावतच येतील. खडीसाखर बना म्हणजे संतांना आवडेल असे वर्तन करा. संतांना काय आवडते ? भगवंताचे अनुसंधान आणि अखंड नामस्मरण याशिवाय दुसरी कोणतीही गोष्ट त्यांना प्रिय नाही. म्हणून आपल्या हृदयामध्ये नामाची ज्योत अखंड तेवत ठेवा. सदगुरू तुमचा शोध घेत येतील आणि तुमच्यावर कृपेचा वर्षाव करतील.
मुक्ति हवी असेल तर गुरुशिवाय गति नाही. गुरूने दाखवून दिलेल्या मार्गानेच साधना करावी लागते. एकच साधना सर्वांना उपयोगी पडत नाही. गुरुभक्तियोगात सर्व साधनांचा समावेश झाल्याने गुरुभक्ति सर्व प्रकारच्या साधकांसाठी उपयोगी आहे. गुरुभक्तियोग साधला की साधक ध्यानमार्गाला लागतो. गुरुध्यान सर्वात उत्तम. गुरुध्यानयोगात गुरुस्मरण, गुरुस्तवन, गुरुनमन व गुरुभजन असे चार योग येतात. गुरुध्यानाने साक्षात्काराच्या सर्व अवस्था प्राप्त होऊन साधक अंतिम अनुभवापर्यंत सहज जातो आणि सविकल्प, निर्विकल्प समाधि, सदानंद व परम शांति लाभून मुक्तपुरुष होतो.....🙏

 

             असंच श्री संत सदगुरू गोदड महाराजांच चरित्र वाचत असताना गोदड महाराज आणि त्यांचे गुरू नारायणनाथ स्वामी यांच्या भेटीविषयी चा प्रसंग आपल्यासमोर मांडतो. विठ्ठल नामात तल्लीन होऊन आपले राजवाडा आई - वडील घरदार सोडून अमरसिंह म्हणजेच गोदड महाराज हे वनांमध्ये फिरू लागले सर्व इंद्रियांचे दमन करून मनावर आपली सत्ता करून त्या बाळ संन्याशाचे भ्रमण सुरू झाले...आता त्याना ब्रम्हप्राप्तीची ओढ लागली..त्या भगवंतास भेटण्याची आस घेऊन त्यांनी घोर कासारबारी पठाराच्या अरण्यात त्यांनी प्रवेश केला...

          गुरुशिवाय ईश्वरप्राप्ती नाही हे त्याना कळून चुकले होते गुरू दर्शनासाठी आता ते उतावीळ झाले होते..
त्यांच्या कठोर साधनेचे फळ मिळन्याचे समय आता जवळ आला होता...

 

ईश्वर प्राप्तीसी कारण ।
मुख्य भक्तीची  जाण ।
मग जे काही भक्तीचे लक्षण ।
गुरुकृपेविन शक्य नाही ।

 


पूर्वसुकृत व भक्तीच्या बळानेच गुरू दर्शन होते व ब्रम्हपद सहज हातासी येते.. कासारबारी पठारावर फिरत असताना तेथील सुंदर अशा परिसरात त्यांचे आगमन झाले न जाणो आता काहीतरी अघटित घडणार याची त्याना जाणीव होऊ लागली..मण प्रफुल्लित झाले अंतर्यामी आनंदाच्या उसळ्या मारू लागल्या ...पहाटेच्या ब्रम्ह मुहूर्तावर त्याना अवर्णनीय आनंद अनुभवण्यास मिळू लागला त्या भावविभोर अवस्थेत चालत असताना अचानक ते एका दृष्टयाला पाहून जागेवर स्तब्ध होऊन थांबले एक कोपीयन धारण केलेले विदेही तेजस्वी सत्पुरुष त्यांच्या समोर उभे राहिले साक्षात "नारायण नाथ स्वामी" अमरसिंहाच्या समोर उभे होते... त्याना पाहताच आनंदाने अमरसिंहाने मोठ्याने आर्त हाक मारली .."गुरुदेव.." नारायनाथानी मागे वळून पाहिले अंतर् मनाने आपल्या शिष्याला ओळखले आणि हाताने इशारा करत जवळ बोलविले...अमरसिंहाचे पूर्वसुकृत फळाला आले होते साक्षात गुरू त्यांच्या समोर उभे होते..त्याना आता आपल्या शरीराची जाणीवच राहिली नव्हती...गुरूंच्या चरणावर साष्टांग दण्डवत करत पायावर त्यांनी मस्तक ठेविले...आपल्या आनंदाश्रूनी गुरूंचे चरण कमल त्यांनी धुतले...गदगद शरीराला आता गुरूंचे आश्रयस्थान सापडले होते...विधात्याची कृपा होऊन आता जन्मोजन्मीचे गुरुचरण त्याना पुन्हा सापडले होते...बराच वेळ गुरू शिष्य भेट चालू होती...लहान वयात आत्मसिद्धीसाठी शरीराची तमा न बाळगता ज्ञानी बालयती आपल्या तेजपुंज नजरेने आपल्या सद्गुरुणा न्याहाळत होता...त्या लहान वयात तपसाधना  करून कृश झालेल्या अमरसिंहास पूर्वपदावर येण्याची आत गुरुदेव पाहत होते काही कालावधी गेल्यावर अमरसिंह भानावर आले ...जन्मोजन्मीचे भाग्य आज आपल्या समोर सदेह आहेत हे पाहून अमरसिंहास आनंदाने काय करावे सुचत नव्हते...दोघेही गुरू शिष्य यांची नजरानजर झाली आणि प्रेमाने गुरुदेव म्हणले " तुला ईश्वर प्राप्ती होईल " हे ऐकून आनंदाने अमरसिंहाचे भाग्य फळाला आले त्यांचे डोळे भरून आले ते साधकाच्या जीवनाचे सार्थक करणारे बोल ऐकून त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला...सदगुरू म्हणले " अमरसिंहा खूप कष्टाने तू साधना केलीस आता समोरच्या झऱ्यावर जा आणि स्नान करून ये.." त्यांच्या आज्ञेप्रमाणे अमरसिंह स्नान करून शरीर शुद्धी केली व शुद्ध अंतकरणाने सद्गुरुंच्या जवळ येऊन बसले आता अमरसिंह स्थिर झाल्याचे पाहून त्यांनी म्हणले " आता मंत्र ग्रहण कर " असा गंभीर आवाज अमरसिंहाच्या कानावर आला .. अमरसिंहाने सर्व चित्त एकाग्र केले नारायण नाथांनी अमरसिंहाच्या कानी गुरुमंत्र दिला...

 

" ॐ अहंम ब्रम्हांस्मि सोहंम् ब्रम्हांस्मि ई हुं.."


 ऐकता क्षणी मानसपूजा आरंभ झाली सद्गुरू मुर्ती डोळ्यासमोर आणून मन एकाग्र करत सद्गुरुंच्या ब्रम्हरूपाची कल्पना केली शुद्ध मनाने जलाभिषेक सुरू केला वासना फाडून ते वस्त्र सद्गुरूंना अर्पण केले अहंभाव उगाळून चंदनाचा टिळा गुरूंना लाविला चित्ताने तुळशीपत्र श्रीगुरूंना अर्पण केले ..अविद्या पूर्ण जाळून जिवात्म्यास नैवैद्य केला स्थूल देह आणि मन हे श्रीगुरु चरणी गुरुदक्षिणा म्हणून अर्पण केले पंचप्राणांची आरती केली आणि अहंभावाची धुपारती करत सद्गुरूंना ओवळीले...नंतर गुरू स्तवन सुरू केले.पूर्णब्रम्ह निजनंदी, निर्गुण मायेचे स्वरूप असलेले श्रीगुरु निराकार आहेत असे वेद बोलतात. तरीही मायेनी अवतार घेऊन कृपा करून उद्धार करतात हेच तर कार्य संत करतात..मायेपासून मुक्त करून उद्धार करतात अशी मनोकमना करून " मला पावन करून घ्या " अशी आर्त प्रार्थना सद्गुरूंना केली...नारायण नाथ अतिशय प्रसन्न झाले... त्यांनी अमरसिंहास उपदेश करून सांगितले " आपण आनंद सांप्रदायाचे पाईक आहोत या मार्गानेच आपल्याला ब्रह्मनंदाची प्राप्ती होऊन निजपद प्राप्त होते आपण निर्गुण उपासक आहोत.कुंडलिनी महामाया अर्चरा मार्गाने जाऊन अध्यात्म ज्ञान प्राप्त होते..नंतर मुद्रांची माहिती अमरसिंहास दिली..अगोचरि ही पूर्ण मुद्रा असून खेचरी,भूचरी आणि चाचरी अशा चार मुद्रा सांगितल्या..स्थूल,सूक्ष्म,कारण आणि महाकारण या चार प्रकारच्या देहाची माहिती करून दिली.आणि त्यांचे प्रमाण " मसूर " आहे याचे रूपक करून दिले... स्वप्न ,जागृती,सुशुप्ती व उन्मनी या अवस्थांचे ज्ञान करून दिले.आनंद संप्रदायाचे लक्षण असलेलं " तत्वमासी " या वेद वाचनाचा परीचय करून दिला..माया आणि ब्रम्हाचे विवरण नित्य करावे अशा तर्हेने सांप्रदाय पुढे चालवावा असा उपदेश केला...गुरुमंत्र हेच महावाक्य आहे त्याचा दैनंदिन जीवनात सतत विचार करावा जीव आणि शिवाची ओळख करून घ्यावी म्हणजेच देहबुद्धी आणि देवबुद्धि चा विचार करावा संतसंगती करून आत्मबोधाचे धडे गिरवावे असा उपदेश केला...

"आकार असलेली वस्तू पूर्ण भासते पण ती अभिन्न असते देहाच्या घटात त्याचेच प्रतिबिंब आहे पण देह म्हणजे तो नाही जसे आकाशात असलेलं सूर्याचे प्रतिबिंब पाण्यात पडते तसेच भूमात्रात असूनही ते अलिप्त आहे तू वेदांचे हे मत प्रमान मानून राहा. "हा उपदेश ऐकून अमरसिंहास आनंद झाला गुरूंना साष्टांग दंडवत करून ते समोर उभे राहिले... श्री गुरू पुढे म्हणाले.."ज्यास आपली परंपरा माहिती नाही त्यास दासीपुत्र  म्हणावे .." आता आपली गुरुपरंपरा ऐक .." गुरू पुत्राने आपल्या गुरुपरंपरेचा जप करावा तरच तो मुक्तीपदापर्यंत पोहीचतो.."मूळ गुरू नारायण त्यांचे शिष्य विष्णू नंतर ब्रम्हा त्यांचे शिष्य नारद मुनी त्यांच्यापासून अवधूत दत्तात्रेय त्यांचे शिष्य जनार्धन नंतर एकनाथ त्यांचे शिष्य गावजी त्यानंतर गोविंद प्रेमळ नंतर धर्मनाथ नंतर प्रेमळनाथ त्यानंतर रामनाथ त्यांचे शिष्य कृष्णनाथ नंतर विठ्ठलनाथ त्यानी नारायनाथांना उपदेश केला व तोच आज मी तुला केला आहे अन आता तू माझा शिष्य झाला आहेस..." अशी महान गुरी परंपरा ऐकून आपल्या गुरूंना पुन्हा अमरसिंहाने साष्टांग दण्डवत केले..कलियुगामध्ये नास्तिक लोकांचा वावर जास्त झाला आहे गुरू कशाला हवा त्याची आम्हाला गरज नाहीय असे मूर्खासारखे लोक बोलतात पण हे काही खरे नाहीय एवढा प्रभू रामचंद्र अवतार असूनही वशिष्ठ मुनींना शरण गेले तसेच श्री कृष्णाने सुद्धा संदीपान ऋषींना गुरू केले होते ज्याने गुरूंचा अनुग्रह घेतला नाही त्याचे जिने प्रेतासारखे मानावे म्हणून तातडीने गुरुसी शरण जावे....


    सदगुरूंनी शिष्याची स्थिती पाहून त्यास योग् नितीचेही ज्ञान दिले आपल्या जवळची तुळशीची माळ त्यास घातली आणि आपली गोधडी त्याच्यावर पांघरली त्याक्षणी आनंदाचा हर्षकल्लोळ झाला सदगुरू म्हणले आता तुझे नाव " गोदड नाथ" असे झाले आहे..
 

मस्तकी हात ठेविला गुरूनं ।
त्यासी ठेंगणे त्रिभुवन ।।
याला मंत्र नलगे काही ।
हात जोडी विठाबाई ।।
गुरूंनी सांगितले कानी ।
गोदड शहाणा त्रिभुवणी ।।



" गोदडी ही तीन अक्षरे असून गो- इंद्रिय ,द - पूर्णब्रम्ह ,डी - म्हणजे माया " इंद्रियाचे दमण करून माया दूर करावी असा अर्थ गुरूंनी अमरसिंहास सांगितला...हे सर्व ऐकून गोदड नाथ आनंदी झाले निजवृत्ती शून्य झाल्या त्यांची भावसमाधी लागली...

यानंतर पुढे सातपुढ्यास जाऊन आपली साधना अशीच चालू ठेवावी समाधानी असावे आणि पंढरीनाथास आठवावे असा उपदेश करून श्रीगुरु आपल्या पुढील प्रवासास निघाले...त्यांनतर गुरूंनी दिलेल्या आज्ञेनुसार आणि भगवन्त विठ्ठलाच्या भेटीसाठी महाराज पुढे जाऊन आपल्या भागवत धर्माचा प्रसार करू लागले आणि दिन दुबळ्या जणांना मार्गदर्शन करू लागले....!

सेवेच्या ठाई तत्पर सदगुरु चरणी निरंतर..!

 - गणेश पंढरीनाथ काकडे

 

 
 


Comments

Popular posts from this blog

मोबाईलवरून पैसे कसे कमवायचे? | Online Earning Marathi Guide

घरबसल्या पैसे कमवण्याचे 10 खात्रीशीर मार्ग (2026 अपडेट)

सरकारी योजना 2026: सामान्य नागरिकांसाठी सुरू असलेल्या 10 महत्वाच्या योजना । मराठी माहिती