श्री संत सदगुरु गोदड महाराज जन्मोत्सव विशेष लेख

              
 
 
श्री संत सदगुरु गोदड महाराज जन्मोत्सव विशेष लेख 

 
 
  " पवित्र तो देश , पावन ते कुळ ,जेथे हरीचे दास जन्म घेती "
 
◆ श्री संत सदगुरु गोदड महाराज जन्मोत्सव ◆
" देवाला आणावे लागते,मनुष्याला जन्माला यावे लागते, संत मात्र इच्छेने अवतार घेतात.."
" देव ते संत...संत ते देव...निमित्त त्या प्रतिमा.."


             श्री संत सदगुरू गोदड महाराजांचे वडील श्री भिकाजीराजे भोसले हे उदापुर नगरीचे राजे होते आई चंद्रभागा या कर्णग्राम म्हणजेच कर्जतच्या तोरडमल घराण्यातील कन्या होत्या बरेच वर्ष त्याना मुलं बाळ नव्हते म्हणून भिकाजीराजे आणि त्यांच्या पत्नी चंद्रभागा दोघेही अस्वस्थ होते ते भगवंताची मनोभावे पूजा अर्चना करत दानधर्म सुद्धा करत असत या दोघांच्या सात्विक अन आचरणाचे फळ म्हणून च तेजोनिधी नारायणाने एके दिवशी पहाटेच्या वेळी माता चंद्रभागा या चिरनिद्रेमध्ये असताना स्वप्नात ब्राम्हणाच्या वेशात येऊन फल स्वरूप श्रीफळ देत सांगितले " हे माते तुमची इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे.. तुमच्या पोटी साक्षात भगवंतांचा अंश जन्म घेणार आहे जो अखंड भागवत धर्माची पताका आपल्या खांद्यावर घेऊन अज्ञानी दीन जनांना परमार्थाची वाट दाखवेल अन तुमच्या कुळाचा उद्धार करेल..प्रसादरूपी श्रीफळ त्यांच्या ओटीमध्ये दिले व हा श्रीफळ ग्रहण करण्यास सांगितले..मातेने त्यांचे विनम्रपणे दर्शन घेतले.
 

अन क्षणात ते ब्राम्हण अदृश्य झाले...माता चंद्रभागा या स्वप्नाने जाग्या झाल्या अन पाहतात तर काय समोर कोणीच नाहींयत...पण जो प्रसादरूपी श्रीफळ त्या ब्राम्हणाने दिला होता तो मात्र त्यांच्या ओटीमध्ये होता... त्यांनी घडलेली सर्व हकीकत भिकाजीराजेंना सांगितली राजेही हे ऐकून आणि श्रीफळ पाहून चक्रावले त्याना आश्चर्याचा धक्का बसला सर्व प्रकार त्यांच्या लक्षात आला साक्षात पांडुरंगाने च हा प्रसाद आपल्याला दिला आहे असे त्यांनी समजून आनंदाने दोघेही पांडुरंगाच्या मूर्तीसमोर नतमस्तक झाले नंतर त्यांनी तो प्रसाद ग्रहण केला..
                काही दिवसांनी चंद्रभागा मातेला दिवस गेले म्हणून मग आपल्या माहेरी तोरडमलांच्या घरी कर्णग्रामी त्याना पाठवण्यात आले.. त्यांनीही आनंदाने आपल्या लाडक्या लेकीचे स्वागत केले..       काही दिवसांनी आपल्या माहेरी आल्यानंतर मातेला डोहाळे लागायला लागले ते डोहाळे कशाचे...तर ते डोहाळे होते विठ्ठल भक्तीचे त्याना सतत टाळ वाजवावे,पखवाज वाजवावे, निरंतर भजन कीर्तन ऐकावे,विठ्ठलाची यथासांग पूजा अर्चा करावी गव्हाची खीर देवाला नैवैदय म्हणून दाखवावी अशा प्रकारचे डोहाळे मातेला लागले होते...
             शके १६८१ ( इ.स १७५९ ) श्रावण शुद्ध दशमी वार गुरुवारी,पुष्य नक्षत्री कर्णग्रामी ( कर्जत ) नगरीमध्ये ईश्वराच्या अंशाने जन्म घेतला...तोरडमलांच्या घरी आनंदोत्सव साजरा केला गेला...ही बातमी लागोलग उदापुरी कळविण्यात आली सर्व उदापुर नगरी आनंदाने न्हाऊ लागली भिकाजीराजें चा आनंद गगनात मावेनासा झाला..त्यांनी विठ्ठलाची मनोभावे पूजा केली सगळीकडे गोडधोड पदार्थ वाटले दानधर्म केले नगरवासींयांनी गुढ्या तोरणे उभारली ...राज्यामध्ये उत्सव साजरा झाला.
 
 
 

ज्यांनी भागवत धर्माची पताका सतत खांद्यावर ठेऊन भागवत धर्माचा प्रसार केला ज्यांना भेटायला स्वतः पांडुरंग दरवर्षी आषाढी एकादशी झाल्यानंतर होणाऱ्या कामिका एकादशी ला त्यांची संजीवन समाधी असलेल्या धाकटी पंढरी म्हणून ओळखल्या जाणार्या कर्जत गावी येतात अशा
थोर भागवत भक्ताचा आज जन्मोत्सव सोहळा जन्मस्थळी आणि समाधीस्थळी कर्जत येथे मोठ्या उत्साहात साजरा होतो.

★ महाराजांच्या जन्माचे पाळणा गीत ★

बाळा जो जो रे,कुलभूषणा,भिकाजीनंदना ।
निद्रा करी बाळा,मनमोहना,अमर तान्ह्या
      ।। बाळा जो जो रे ।। धृ ।।
पाळणा लांबविला,उदापुरी, भोसल्यांचे वंशी ।
पुत्र जन्मला,ऋषीकेशी, चंद्र भागेच्या कुशी
     ।। बाळा जो जो रे ।।१।।

हालवी चंद्रभागा,सुंदरी,धरूनि प्रेमे दोरी ।
पुष्पे वर्षीली,सुरवरी, गर्जत जयजयकारी
      ।। बाळा जो जो रे ।।२।।

जन्मोनि भोसले वंशी,बालपणी,वैराग्याशी ।
तप करिसी,सातपुड्याशी,अखंड द्वादश वर्षी 
     ।। बाळा जो जो रे ।।३।।

येवोनि नारायणनाथ, सत्वर,सांगे जन्मांतर ।
गोदड परब्रम्ह,सत्वर,होई कलियुगी अवतार 
    ।। बाळा जो जो रे ।।४।।

जावोनी वज्रेश्वरी,तप केले,द्वाश वर्षी ।
प्रसन्न होवोनि,देवी नी,माळ घातली कंठी 
          ।। बाळा जो जो रे ।।५।।

विठू आज्ञेवरुनी, आले कर्ण(कर्जत) ग्रामी,जाऊनि राहिले ।
मातुलासी,करी तपश्चर्येसी 

    ।। बाळा जो जो रे ।।६।।

गोदड आले,उमेपाशी,भूक लागली आम्हांसी ।
सत्वर देई,भोजनासी,विलंब ना करिसी 
   ।। बाळा जो जो रे ।।७।।

पाचारुनी,भिमासी,करी निरंतर सेवेसी ।
दिला आशिष,उमेसी, सत्वर दूध प्राशुनी 
  ।। बाळा जो जो रे ।।८।। 

विश्वव्यापक,गोदड,निद्रा करी बा सखया ।
तुजवर कुरवंडी,करुनिया ,सांडिन आपुली काया 
  ।। बाळा जो जो रे ।।९।।

गोदड भावाचा,भुकेला,भक्तांमध्ये लीन झाला ।
दास विठ्ठल,एकीला,पाळणा गाईला 
  ।।बाळा जो जो रे  ।।१०।।

                   पाळणा गीत 
             - ह.भ.प.श्री पंढरीनाथ प्रभाकर काकडे


   सेवेच्या ठाई तत्पर सदगुरू चरणी निरंतर 
- चि. गणेश पंढरीनाथ काकडे

Comments

Popular posts from this blog

मोबाईलवरून पैसे कसे कमवायचे? | Online Earning Marathi Guide

घरबसल्या पैसे कमवण्याचे 10 खात्रीशीर मार्ग (2026 अपडेट)

सरकारी योजना 2026: सामान्य नागरिकांसाठी सुरू असलेल्या 10 महत्वाच्या योजना । मराठी माहिती