संत नामदेवांची समाधि
संत नामदेवांची समाधि !
शके १२७२ च्या आषाढ व. १३ या दिवशी पंढरीच्या विठ्ठलाच्या सगुण भक्तीचा प्रसार करणारे प्रसिद्ध भगवद्भक्त श्रीनामदेव हे समाधिस्थ झाले.
तेराव्या शतकामध्ये महाराष्ट्रांत भक्तीचा जो डांगोरा पिटला जात होता, त्याचे बरेचसे श्रेय संत नामदेवांकडे आहे. नगर जिल्ह्यांतील नेवासे गांवी याच काळी ज्ञानदेवांची ज्ञानेश्वरी अवतरली होती. पांडुरंगाचा निस्सीम सगुणभक्त नामदेव यांचेसह आपण तीर्थयात्रा करावी अशी प्रेरणा ज्ञानदेवांना झाली. आणि "तुझिये संगतीचे नित्य सुख प्यावें । सार्थक करावें संसाराचें ॥” असें नामदेवांना विनवून ज्ञानदेवादि मंडळींनी उत्तर हिंदुस्थानची तीर्थयात्रा पूर्ण केली. भागवत धर्माचा प्रसार साऱ्या भारतात झाला. परंतु नामदेवांची थोरवी आणखी एका दृष्टीने मोठी आहे. ज्ञानदेवादि भावंडांचे प्रयाण झाल्यावर नामदेव कांहीसे उदास झाले. उत्तरेत म्लेंच्छ राज्य होऊन धर्माचा -हास होत होता. ते पाहून संत नामदेव पांच पन्नास वारकऱ्यांसहित परत उत्तरेत गेले. पंजाबपर्यंत त्यांनी विठ्ठलभक्ति पोचविली ! हिंदी भाषेत कवनें केली, त्यांपैकी काही शीखांच्या 'ग्रंथसाहेबां'त संग्रहीत केलेली आहेत. पंजाबमध्ये गुरुदासपूर जिल्ह्यांत 'घुमान' गांवीं नामदेवांच्या पादुकाची पूजा आज सहाशे वर्षे चालू आहे. 'बाबा नामदेवायी' म्हणून त्यांच्या अनुयायांना नामहि प्राप्त झाले. जुनागढचे नरसी मेहता आणि शिख पंथाचे प्रवर्तक नानक यानी नामदेवांच्या भक्तीची आणि अभंगवाणीची प्रशंसा केली आहे. आजहि पंजाबांत नामदेवांचे अनुयायी हजारोंनी दिसतात. तेव्हां तेराव्या शतकांतील 'भोळ्याभाबड्या' वारकरी संताची ही कामगिरी अपूर्व नाही असे कोण म्हणेल ?
नामदेवांचे पूर्वज यदूशेट हे शिंपी जातीतील होते. यांच्यापासून पांचवा पुरुष दामाशेटी. यांच्या बायकोचें नांव गोणाई. याच दांपत्यास शके ११९२ मध्ये जें पुत्ररत्न झाले तेच प्रसिद्ध नामदेव होत. बालपणापासूनच संत नामदेव विठ्ठलभक्तीत रंगून गेले. याच दिवशी मराठी वाङ्मयांत प्रसिद्ध असलेली 'नामयाची दासी जनी' हिने सुद्धां समाधि घेतली.
-३ जुलै १३५०
श्री संत शिरोमणी नामदेव महाराज की जय

Comments
Post a Comment